श्रद्धां भागवते शास्त्रेऽनिन्दामन्यत्र चापि हि ।

मनोवाक्कर्मदण्डं च सत्यं शमदमावपि ॥२६॥

सगुण अथवा निर्गुण । जेथ भगवत्स्वरूपवर्णन ।

कां भगवंत बोलिला आपण । अथवा भगवद्गुणकीर्ति जेथें ॥५०४॥

तें तें राया शास्त्र जाण । आवडे जैसें जीवुप्राण ।

विशेषेंसीं ज्ञानकथन । सप्रेम पूर्ण पढियंतें ॥५०५॥

गुरुमुखें ज्ञानकथा गोड । तेणें श्रीभागवतीं श्रद्धा दृढ ।

श्रवणें पुरे जीवाचें कोड । वोसरे चाड विषयांची ॥५०६॥

जीवीं नाहीं विषयकौतुकें । तरी विषय आवश्यक ।

साधकां होती बाधक । तेणें आत्यंतिक अनुतापु ॥५०७॥

अनिवार विषयावस्था । त्यागिली न वचे निजसत्ता ।

तेणें मुमुक्षूच्या चित्ता । अत्यंत व्यथा अनुतापें ॥५०८॥

नसतां विषयांची अतिप्रीति । स्वतां नव्हे विषयनिवृत्ति ।

ऐशिया साधकांप्रती । निर्णीत शास्त्रार्थीं नेमिला नेमु ॥५०९॥

नाहीं विषयांची आसक्ति । ना नव्हे विषयनिवृत्ति ।

ऐशी जे कां साधकस्थिति । नेमू त्याप्रती शास्त्रें केला ॥५१०॥

जो कां केवळ विषयासक्त । तो कदा न मानी शास्त्रार्थ ।

कां जो झाला जीवन्मुक्त । तोही शास्त्रार्थ मानूनि न मानी ॥५११॥

जैसी मृगजळाची भासे स्थिति । तैसे विषय मुक्तांप्रती ।

त्या विषयांचिये निवृत्ती । कोणते शास्त्रार्थीं मानावा नेमु ॥५१२॥

एवं अत्यासक्त अतिविरक्त । त्यांसी नेमु न चले येथ ।

मुमुक्षूंसीच शास्त्रार्थ । नेमी निश्चित निजनेमें ॥५१३॥

तेथ गुरुशिष्यसंवाद । करितां ज्ञानार्थबोध ।

ते बोधीं बाधी विषयबाध । तत्त्यागीं प्रसिद्ध शास्त्रार्थनेमु ॥५१४॥

मनसा-वाचा-कर्मावरोधु । येणें विषयंचा त्रिविध बाधु ।

त्या तिहींसही त्रिविधु । शास्त्रें अतिशुद्धु नेमिला नेमु ॥५१५॥

( पूर्वश्लोकोत्तरार्धम् ) - मनोवाक्कमदण्डं च सत्यं शमदमावपि ।

मनासी नेमु उपशमाचा । इंद्रियां नेमु तो दमाचा ।

सत्यें नेमिली वाचा । तिहींसही तिहींचा निजनेमु ॥५१६॥

विषयकाम गज दारुण । अहंमदें उन्मत्त पूर्ण ।

देहतारुण्यें अतिघूर्ण । तोडी बंधन विधीचें ॥५१७॥

रवंदी सुहृद राजा गुरु । सोंडां कवळी स्वर्गशिखरु ।

नरकनदीमाजीं अपारु । अतिदुस्तरु बुड्या देत ॥५१८॥

धर्मजळें क्षाळे अवचिता । सवेंचि सलोभ धुळी घाली माथां ।

घोळसी ब्रह्मादिकां समस्तां । अहंममता गर्जतु ॥५१९॥

त्यासी विवेकमहावत जाण । माथां चढों जाणे आपण ।

शास्त्रविधी-अंकुशें पूर्ण । धरिला आवरून करकरितु ॥५२०॥

त्यासी उपशमाचें संरक्षण । वैराग्ययुक्त ठेवूनि जाण ।

दमाचे शृंखळीं आकळून । सत्याचे स्तंभीं पूर्ण विवेकु बांधे ॥५२१॥

मनसा-वाचा-कायिक कर्म । येणें विषयबाधा बाधी परम ।

त्या तिहींसी केला त्रिविध नेम । त्या नेमाचें वर्म ऐक राया ॥५२२॥

आतां शमची ऐशी स्थिती । मनबुद्धयादि चित्तवृत्ती ।

सांडवूनि विषयासक्ती । लावी परमार्थीं प्रबोधूनि ॥५२३॥

पूर्वे उगवतां गभस्ती । आंधारु सांडी त्रिजगती ।

तेवीं गुरुवाक्यें शमाची प्राप्ती । विषयनिवृत्ति मानसिक ॥५२४॥;

बाह्य इंद्रियप्रवृत्ती । ’दमें’ दमोनि गुरुवाक्यस्थिती ।

मग शमाची संगति । आणी निवृत्ती इंद्रियकर्में ॥५२५॥

कन्या प्रतिपाळूनि जैसी । दान देतां जांवयासी ।

त्यागी बापचे कुळगोत्रासी । दमें इंद्रियें तैशीं विषयार्था ॥५२६॥;

झणीं वाचा जा‍ईल विकळ । तिसी ’सत्याच’ महामोकळ ।

दे‍ऊनि केली निखळ । अति‍अढळ सत्यधूत वाणी ॥५२७॥

"सत्यवादिया ब्रह्मादि वंदिती । असत्या होय अधोगती" ।

ऐसें व्याख्यान जे करिती । तेही वदती असत्य ॥५२८॥

कां रामनामाच्या आवृत्तीं । वाचा धूतली स्मरणोक्तीं ।

ते असत्यामाजीं पुढती । कदा कल्पंतीं बुडेना ॥५२९॥

मंथूनि काढिलें नवनीत । तें पुढती न बुडे ताकांत ।

तेवीं नामें वाचा निर्धूत । असत्य तेथ स्पर्शेना ॥५३०॥

जेवीं लागलेनि रविकरें । घृतकणिका स्वयें विरे ।

तेवीं सत्याचेनि निजनिर्धारें । असत्य चमत्कारें समूळ उडे ॥५३१॥

चंदनाचिया चौफेरीं । काष्ठत्वा मुकती खैर बोरी ।

तेवीं नामाच्या निजगजरीं । वाचेमाझारीं निजसत्य प्रगटे ॥५३२॥

झालेनि अर्कप्रकाशें । खद्योत हारपती जैसे ।

तेवीं रामनामसौरसें । लोपे अनायासें असत्य ॥५३३॥

अंवसेसी प्रतिपदे कुहु । गेलिया बिंब सांडी राहु ।

तेव्हां प्रकाशाचा समूहु । प्रगटे बहु जगामाजीं ॥५३४॥

तेवीं असत्याचेनि आक्रमें । वाचा प्रकाशे सत्यसंभ्रमें ।

जेवीं राजाज्ञा‍अनुक्रमें । प्रजा स्वधर्में वर्तती ॥५३५॥

सत्यापरतें नाहीं तप । सत्यापरता नाहीं जप ।

सत्यें पाविजे सद्रूप । सत्यें निष्पाप साधक होती ॥५३६॥

एवं काया वाचा आणि मनें । शमदमादिसत्यलक्षणें ।

जो नेमिला त्रिविधविंदानें । त्याचे विषयाचें धरणें तत्काळ उठी ॥५३७॥

ऐसिया स्वार्थलागीं जीवीं । भगवच्छास्त्रीं आवडी करावी ।

परी आणिकां शास्त्रां न लावी । द्वेषभावीं निंदेचें बोट ॥५३८॥

एका स्तुती एका निंदा । करितां आदळे अंगीं बाधा ।

यालागीं निंदानुवादा । साधक कदा नातळती ॥५३९॥

अर्धांगींची लक्ष्मी वंदावी । मा चरणींची गंगा काय निंदावी ।

निजजननी नमस्करावी । काय येरां द्यावी पांपर ॥५४०॥

तरी भज्य भजावें भजनीं । परी निंदा स्तुति सांडूनि दोनी ।

जो निजसत्यें होय मौनी । तैं ब्रह्मज्ञानीं अधिकारु ॥५४१॥

ऐशी न करितां व्युत्पत्ति । न सोशितां हे कष्टस्थिति ।

भावें करितां भगवद्भक्ति । फुकाची मुक्ति हरिभक्तां ॥५४२॥

ते भक्तीची निजस्थिति । राया सांगेन तुजप्रती ।

सुगमत्वें परमात्मप्राप्ति । हरिभक्त पावती तें ऐक ॥५४३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to श्रीएकनाथी भागवत


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
 भवानी तलवारीचे रहस्य
खुनाची वेळ
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
लोकभ्रमाच्या दंतकथा
संभाजी महाराज - चरित्र (Chava)
शिवाजी सावंत
कथा: निर्णय
पैलतीराच्या गोष्टी