मदर्पणं निष्फलं वा सात्त्विकं निजकर्म तत् ।

राजसं फलसंकल्पं हिंसाप्रायादि तामसम् ॥२३॥

सकळ कर्मक्रियाचरण । संकल्पेंवीण आपण।

सहजें होय ब्रह्मार्पण । हें निर्गुण साधन शोधितसत्वें ॥८॥

वर्णाश्रमधर्म सकळ । आचरे परी न वांछी फळ ।

माझे भक्तीचें प्रेम प्रबळ । हें कर्म केवळ सात्विक ॥९॥

माझें भजन हाचि स्वधर्म । याचि नांव गा निजकर्म ।

ऐसें ज्यासी कळे वर्म । सात्त्विक कर्म या नांव ॥३१०॥

स्वधर्म आचरोनि सकळ । इंद्रादि देवां यजनशीळ ।

जो वांछी इहामुत्र फळ । हें कर्म केवळ राजस ॥११॥

जे कर्मीं प्रकट हिंसा घडे । कां आमिचारिक करणें पडे ।

स्वरुपें जें कर्म कुडें । तें जाण धडपुडें तामस ॥१२॥

जेथ दांभिक कर्माचरु । जेथ साधूंसी अतिमत्सरु ।

जेथ निंदेचा प्रबळ भरु । तो कर्मादरु तामस ॥१३॥

आतां त्रिगुण आणि निर्गुण । यांचें चतुर्विध लक्षण ।

या श्लोकीं श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सांगत ॥१४॥;

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel