श्रीउद्धव उवाच ।

त्वं ब्रह्म परमं साक्षाद् अनाद्यन्तमपावृतम् ।

सर्वेषामपि भावानां त्राणस्थित्यप्ययोद्‍भवः ॥१॥

भूतभौतिकांचें तूं कारण । तुझेनि जन्म-स्थिति-निदान ।

इतुकें करोनि अकर्ता जाण । ब्रह्म परिपूर्ण तूं यालागीं ॥७८॥

म्हणसी उत्पत्ति स्थिति मरण । भूतांतें प्रकृति करी जाण ।

ते प्रकृति तुझे अधीन । तुझेनि चलन प्रकृतीसी ॥७९॥

यालागीं प्रकृति ते परतंत्र । तूं परमात्मा स्वतंत्र ।

अनादि अव्यवो अपार । श्रुतींसी पार न कळेचि ॥८०॥

प्रकृतीसी तुझें आवरण । तूं अनंत गा निरावरण ।

जीवांचे स्वरूप गा तूं आपण । परी जीवपण तुज नाहीं ॥८१॥

जीवू तितुका अज्ञानयुक्त । तूं ज्ञानाज्ञानातीत निश्चित ।

यालागीं ब्रह्म तूं साक्षात । अविनाशवंत अपरोक्ष ॥८२॥

तो तूं अपरोक्ष कैसा म्हणशी । सर्वीं सर्वत्र सबाह्य असशी ।

ऐसा असोनि अतर्क्य होशीं । हृषीकेशी तें ऐक ॥८३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel