प्रतिग्रहं मन्यमानस्तपस्तेजोयशोनुदम् ।

अन्याभ्यामेव जीवेत शीलैर्वा दोषदृक् तयोः ॥४१॥

स्वधर्मनिष्ठ ब्राह्मणापाशीं । तप-तेज-धैर्य-यशोराशी ।

प्रतिग्रहो इतुकियांसी । मूळ नाशासी कारण ॥४१०॥

जो स्वधर्मनिष्ठ ब्राह्मण । करी प्रतिग्रहो अंगीकरण ।

तो जाण पां `साधारण' । हें एक लक्षण द्विजाचें ॥११॥

जो प्रतिग्रह पराङ्‍मुख ब्राह्मण । तेणें याजन अध्यापन जाण ।

स्वधर्मेकरूनि द्रव्यार्जन । जीविकावर्तन करावें ॥१२॥

धरोनि द्रव्याशा मानसीं । न करावें यागान्त कर्मासी ।

कां सांगोनि वेदाक्षरासी । द्रव्य त्यापाशीं इच्छूं नये ॥१३॥

करूनि वेदाक्षरदान । जो शिष्याचेंही न घे धन ।

ऐसा वैराग्यें परिपूर्ण । तो `शुद्ध ब्राह्मण' सर्वथा ॥१४॥

ऐक त्याचें जीविकावर्तन । `शिल' कां `उंछवृत्ती' जाण ।

ऐक त्याचेंही लक्षण । सकारण सांगेन ॥१५॥

शेत संवगूनि नेल्या जाण । ते शेतीं प्राप्त कणिसें कां कण ।

ते शिलवृत्ति संपूर्ण । ऐक लक्षण उंछवृत्तीचें ॥१६॥

स्वामी नसतां सांडले जाण । ऐसे हाटवाटीं पडिले कण ।

ते वेंचूनि घेणें आपण । जीविकावर्तन तयांवरी ॥१७॥

या नांव उंछवृत्ती । ब्राह्मणाची `अतिशुद्ध' स्थिती ।

तोही प्रकार उद्धवाप्रती । स्वयें श्रीपति सांगत ॥१८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel