ज्ञाने कर्मणि योगे च, वार्तायां दण्डधारणे ।

यावानर्थो नृणां तात, तावांस्तेऽहं चतुर्विधः ॥३३॥

मोक्षालागीं ’ज्ञान’ साधन । धर्मालागीं ’स्वधर्मचरण’ ।

स्वामित्वालागीं ’दंडधारण’ । ’अर्थोद्यम’ जाण जीविकावृत्तीं ॥३॥

इहामुत्र कामभोग । तदर्थ करिती ’योगयाग’ ।

चहूं पुरुषार्थीं हा चांग । साधनप्रयोग अभक्तां ॥४॥

ऐसें सोशितां साधन । सहसा सिद्धी न पवे जाण ।

अनेक विकळता दूषण । माजीं छळी विघ्न देवांचें ॥५॥

तैसें मद्भक्तांसी नव्हे जाण । माझें करितां अनन्यभजन ।

चारी पुरुषार्थ येती शरण । पायां सुरगण लागती ॥६॥

उद्धवा जे मज अनन्यशरण । त्यांचा धर्म अर्थ मीचि पूर्ण ।

त्यांचा काम तोही मीचि जाण । मोक्षही संपूर्ण मी त्यांचा ॥७॥

अभक्तां भोगक्षयें पुनरावृत्ती । भक्तांसी भोग भोगितां नित्यमुक्ती ।

एवढी माझ्या भक्तीची ख्याती । जाण निश्चितीं उद्धवा ॥८॥

ऐशी ऐकतां देवाची मात । उद्धव प्रेमें वोसंडला अद्भुत ।

तेणें प्रेमें लोधला कृष्णनाथ। हर्षें बोलत तेणेंसी ॥९॥

उद्धवा तुझे चारी पुरुषार्थ । तो मी प्रत्यक्ष भगवंत ।

ऐसें बोलोनि हर्षयुक्त । हृदयाआंत आलिंगी ॥६१०॥

हर्षें देतां आलिंगन । कृष्ण विसरला कृष्णपण ।

उद्धव स्वानंदीं निमग्न । उद्धवपण विसरला ॥११॥

कैसें अभिनव आलिंगन । दोघांचें गेलें दोनीपण ।

पूर्ण चैतन्य स्वानंदघन । परिपूर्ण स्वयें झाले ॥१२॥

तेथ विरोनि गेला हेतु । वेदेंसहित बुडाली मातु ।

एकवटला देवीं भक्तु । एकीं एकांतु एकत्वें ॥१३॥

तेथ मावळले धर्माधर्म । क्रियेसहित उडालें कर्म ।

भ्रम आणि निर्भ्रम । या दोंहीचें नाम असेना ॥१४॥

भेद घेऊनि गेला अभेदा । बोध घेऊनि गेला निजबोधा ।

आनंद लाजला आनंदा । ऐशिया निजपदा उद्धव पावे ॥१५॥

मी जाहलों परब्रह्म । हाही मुख्यत्वें जेथ भ्रम ।

कृष्णालिंगनाचा हा धर्म । जाहला निरुपम निजवस्तु ॥१६॥

यावरी कृष्ण सर्वज्ञ । सोडोनियां आलिंगन ।

ऐक्यबोधें उद्धवासी जाण । निजभक्तपण प्रबोधी ॥१७॥

तेव्हां उद्धव चमत्कारला । अतिशयें चाकाटला ।

परम विस्मयें दाटला। तटस्थ ठेला ते काळीं ॥१८॥

मग म्हणे हे निजात्मता । स्वतःसिद्ध जवळी असतां ।

जनासी न कळे सर्वथा । साधकांच्या हाता चढे केवीं ॥१९॥

तें उद्धवाचें मनोगत । जाणोनियां श्रीकृष्णनाथ ।

तदर्थींचा सुनिश्चित । असे सांगत उपाय ॥६२०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel