एतैर्दोषैर्विहीनाय, ब्रह्मण्याय प्रियाय च ।

साधवे शुचये ब्रूयाद्भक्तिः स्याच्छूद्रयोषिताम् ॥३१॥

उपदेशीं मुख्य अधिकारपण । धडधडीत वैराग्य पूर्ण ।

तेंही पिशाचवैराग्य नव्हे जाण । विवेकसंपन्न शास्त्रोक्त ॥३६॥

दिवस चारी वैराग्य केलें । सवेंचि विषयार्थीं लागले ।

तेथ जें जें उपदेशिलें । तें सर्पासि पाजिलें दुग्ध जैसें ॥३७॥

जेथ वैराग्य निघोनि जाये । तेथ ज्ञानाभिमान उरला राहे ।

तेणें अभिमानें करी काये । गुणदोष पाहे श्रेष्ठांचे ॥३८॥

नीच निंदी हेळसून । श्रेष्ठांचे पाहे दोषगुण ।

जेथ वैराग्य होय क्षीण । तेथें ज्ञानाभिमान चढे ऐसा ॥३९॥

उद्धवा जगीं दोनी अवस्था । वैराग्य कां विषयासक्तता ।

तिसरे अवस्थेची कथा । जाण सर्वथा असेना ॥५४०॥

जेथ विवेकें विषयो होय क्षीण । तेथ वैराग्य प्रबळे परिपूर्ण ।

जेथ विवेकेंसीं वैराग्य क्षीण । तेथ विषयाचरण ज्ञानाभिमानें ॥४१॥

यालागीं होय जंव ब्रह्मज्ञान । तंव जो वैराग्य राखे पूर्ण ।

वैराग्यें गुरुसी अनन्यशरण । तें ’अधिकारीरत्‍न’ उपदेशा ॥४२॥

गत श्लोकींचें दोषनिरुपण । आतां बोलिलों वैराग्यार्थ जाण ।

इहीं दोषीं ज्यासी रहितपण । तो ’अधिकारी’ पूर्ण सच्छिष्य ॥४३॥

ज्यासी ब्रह्मत्वें ब्राह्मणभक्ती । अनन्यभावें भजे भूर्ती ।

त्याची आंदणी भक्ती विरक्ती । तो जाण निश्चितीं ’अधिकारी’ ॥४४॥

गुरुचा पढियंताही पूर्ण । त्यापासीं असल्या अभक्तपण ।

त्यासी नव्हे ब्रह्मज्ञान । अनन्य भजन जंव न करी ॥४५॥

प्रिय आणि भजनशीळ । दोषरहित निर्मळ ।

त्यासी विरक्त करुनि अढळ । उपदेशावें प्रांजळ हें गुह्य ज्ञान ॥४६॥

स्वदारा आणि स्वधन । यांचा लोभ ज्यासी संपूर्ण ।

त्यासी स्वर्ग ना मुक्तपण । जन्ममरण अनिवार ॥४७॥

परदारा परधन । सर्वथा नातळे ज्याचें मन ।

ऐसें ज्यापाशीं पवित्रपण । त्यासी हें ज्ञान उपदेशावें ॥४८॥

जो वैराग्याचा वोतिला । विवेकें पूर्ण वोसंडला ।

सद्गुरुसेवेसी जीवें विकला । चरणीं विनटला अनन्यत्वें ॥४९॥

सांडूनि निजमहिमान । श्रीगुरुसेवेलागीं आपण ।

ज्यासी आवडे रंकपण । ऐसा सेवेसी पूर्ण सद्भाव ॥५५०॥

अमरश्रेष्ठ जे सुरवर । ते मानी सद्गुरुचे किंकर ।

सद्गुरुहूनियां थोर । हरिहर मानीना ॥५१॥

ज्यासी नाहीं गर्वमद । ज्यासी नाहीं कामक्रोध ।

ज्यासी नावडे विकल्पभेद । तो शिष्य शुद्ध परमार्थी ॥५२॥

काया वाचा मन धन । सांडूनि समर्थतामहिमान ।

जो सद्गुरुसी अनन्यशरण । तो सच्छिष्य जाण साधुत्वें ॥५३॥

सांडूनि लज्जा लौकिक । जो ब्रह्मज्ञानाचा याचक ।

सद्गुरुवचनार्थी चातक । तो आवश्यक उपदेशीं ॥५४॥

जे कां द्विजन्म्यांहूनि बाहेरी । वेदें वाळूनि सांडिले दूरीं ।

जे कां मंत्रार्थी अमंत्री । जे अनधिकारी श्रवणासी ॥५५॥

ज्यांसी नाहीं आश्रमधर्म । ज्यांसी नाहीं श्रौतकर्म ।

ज्यांसी नाहीं जप होम । जे वर्णाधम अतिनीच ॥५६॥

ऐसे जे कां शूद्रजन । ऐकोनि ये ग्रंथींचें ज्ञान ।

निवाराया जन्ममरण । उपजे दारुण विरक्ती ॥५७॥

उखितांच एकसरें चित्तें । मनींहूनि विटे विषयांतें ।

मग चित्तें वित्तें जीवितें । रिघे सद्गुरुतें अनन्यशरण ॥५८॥

गुरुसी पुसों नेणे प्रश्न । म्हणे निवारीं जन्ममरण ।

भावार्थें घाली लोटांगण । शुद्ध श्रद्धा संपूर्ण परमार्थीं ॥५९॥

ते होत कां शूद्रजन । त्यांसी उपदेशिता ब्रह्मज्ञान ।

उद्धवा कदा न लागे दूषण । हें सत्यवचन पैं माझें ॥५६०॥

जे कां अपेक्षोनियां वित्त । चतुर्वर्णा उपदेशित ।

ते धनलोभें लोलुप एथ । नाहीं घेइजेत गुरुत्वें ॥६१॥

जेथ गुरुशींच सलोभता । तेथ शिष्याची बुडे विरक्तता ।

ऐशिये ठायीं उपदेश घेतां । परमार्थतां अपघातु ॥६२॥

निर्लोभत्वें कृपेनें पूर्ण । सद्गुरु उपदेशी शुद्रजन ।

ऐसेनि करी जो दीनोद्धरण । तेथ न लगे दूषण । उपदेशा ॥६३॥;

जेणें तडफडूनि जान । वैराग्याशी ये मरण ।

जेणें ज्ञात्यासी लागे दूशण । तो स्त्रीसंग आपण न करावा ॥६४॥

स्त्री देखतांचि अवचितीं । तत्काल पाडी अधःपातीं ।

तिची जाहलिया संगती । कैंची धडगती सज्ञाना ॥६५॥

प्रमादीं पाडी सर्वार्थीं । हे ’प्रमदा’ नामाची निजख्याती ।

तिची जाहलिया नित्य संगती । केवीं परमार्थीं तरतील ॥६६॥

जिचें देखतांचि वदन । काम मोकली कटाक्षबाण ।

तेथ कायसा उपदेश जाण । आली नागवण परमार्था ॥६७॥

उद्धवा तुज हेंचि मागतों जाण । नको स्त्रियांशीं संभाषण ।

नको स्त्रियांचें अवलोकन । नको स्त्रीवचन कानीं घेऊं ॥६८॥

नको नको स्त्रियांशीं मात । नको नको स्त्रीयांशीं एकांत ।

नको नको स्त्रियांशीं संगत । निंद्य लोकांत सर्वार्थीं ॥६९॥

नको नको स्त्रियांचा अनुवाद । नको नको स्त्रियांचा संवाद ।

नको नको स्त्रियांसी करुं बोध । मिथ्या प्रवाद अंगीं वाजे ॥५७०॥

स्वभावें सात्त्विक वनिता । गोष्टी सांगों आली परमार्था ।

तोचि विकल्प तत्त्वतां । सुहृदां समस्तां परिकल्पे ॥७१॥

यालागीं प्रमदा जन । सर्वथा त्यागावा आपण ।

प्रमदासंगतीं ब्रह्मज्ञान । सर्वथा जाण वाढेना ॥७२॥आशंका ॥

उपदेशीं त्याज्य स्त्रिया जरी । तरी मागिलीं थोरथोरीं ।

उपदेशिल्या कैशापरी । तें ऐक निर्धारीं सांगेन ॥७३॥

श्रेष्ठ याज्ञवल्क्य पाहीं । तेणें उपनिषदांच्या ठायीं ।

उपदेशिली मैत्रेयी । नानायुक्तीं पाहीं प्रबोधूनि ॥७४॥

स्वयें नारद महामुनी । प्रर्‍हादाची निजजननि ।

इंद्रापासूनी सोडवूनी । ब्रह्मज्ञानीं उपदेशी ॥७५॥

अवतरोनि कपिलमुनी । बैसोनियां सिद्धासनीं ।

देवहूतीलागोनी । ब्रह्मज्ञानीं प्रबोधी ॥७६॥

जो योगियांचा मुकुटमणी । कैलासपति शूळपाणी ।

भव उपदेशी भवानी । ब्रह्मज्ञानी निजबोधें ॥७७॥

इतरांची गोठी कायशी । तुवांचि गा हृषीकेशी ।

उपदेशिलें यज्ञपत्‍न्यांसी । ऐसें म्हणसी उद्धवा ॥७८॥

असो देखोनियां सद्भावा । उपदेश करुं म्हणशी कणवा ।

तरी तो अधिकार ओळखावा । ऐक उद्धवा सांगेन ॥७९॥

ऐक उद्धवा निश्चित । वाचाळ स्त्री ते अनुचित ।

तेथें उपदेश करणें तें व्यर्थ । लागे अपघात गुरुत्वा ॥५८०॥

जेथें स्त्रीस अति बडबड । ब्रह्मज्ञानें गर्जे तोंड ।

जेथें विषयाचा धुमाड । परमार्थ गोड परपुरुषीं ॥८१॥

जे स्त्री ब्रह्मज्ञानीं धीट । मुखीं अत्यंत वटवट ।

तिसी उपदेश करुं नये स्पष्ट । अपवादाचें बोट जेणें लागे ॥८२॥

तेथें म्यां ही केली विनंति । श्रीजनार्दन स्वामीप्रति ।

स्त्रिया शूद्र उपदेशार्थ येती । काय निश्चितीं सांगावें ॥८३॥

गुरुवेगळा मार्ग नाहीं । म्हणोनि येती लवलाही ।

त्यांसी उपदेशावें काई । हें माझ्या हृदयीं स्मरेना ॥८४॥

हें ऐकोनियां वचन । संतोषले श्रीजनार्दन ।

जेणें होय चित्ताचें शोधन । तें ’नाम’ जाण उपदेशी ॥८५॥

चित्तशुद्धि झालिया जाण । वोरसोनि येतें आपण ।

अनन्य भावें मग शरण । आल्या ज्ञान उपदेशी ॥८६॥

स्त्रीपुरुष-अवलोकन । जयाचे दृष्टीं समसमान ।

ऐसेनि अनुभवें जो परिपूर्ण । तोचि स्त्रियांसी जाण उपदेशी ॥८७॥

तोही अधिकार न पाहतां । उपदेश न करीं सर्वथा ।

त्याही उपदेशाची कथा । ऐक तत्त्वतां सांगेन ॥८८॥

म्यां ज्या कां निंदिल्या वनिता । त्यांमाजीं सभाग्या सात्त्विकता ।

सांडोनियां विषयावस्था । जे परमार्था उद्यत ॥८९॥

त्यजूनियां प्रपंचाची हाव । नावडे विषयाचें नांव ।

वैराग्यें उठला सद्भाव । घेऊनि धांव परमार्थी ॥५९०॥

अतिथि आणि पतिपुत्रांसी । भोजनीं समता नित्य जिसी ।

धनलोभ नाहीं मानसीं । परमार्थीं तिसी अधिकारु ॥९१॥

जन्ममरणनिवारणीं । जीवामनाची नित्य काचणी ।

माझे भवपाशच्छेदनीं । धर्मदाता कोणी मिळता का ॥९२॥

सद्गुरुप्राप्तीची अतिआर्त । काया वाचा वित्त जीवित ।

कुरवंडी करुनि सांडित । परमार्थार्थ सद्भावें ॥९३॥

यापरी निजपरमार्था । सद्भावें जे विनटे वनिता ।

उद्धवा तिसी हें उपदेशितां । दोष सर्वथा लागेना ॥९४॥

क्षत्रिय वैश्य स्त्री शूद्रजन । यांची सच्छ्रद्धा दृढ पाहून ।

उपदेशितां ब्रह्मज्ञान । दोषनिर्दळण शिष्यांचे ॥९५॥

उपदेशितां ब्रह्मज्ञान । जैं गुरुसीच लागे दूषण ।

तैं शिष्यासी उद्धरी कोण । हें व्याख्यान अबद्ध ॥९६॥

पहावया पात्रशुद्धता । मी बोलिलों दोषवार्ता ।

वांचूनि ब्रह्मज्ञान उपदेशितां । दोष सर्वथा असेना ॥९७॥;

हें ज्ञान जाणितल्यापाठीं । जाणणेंचि सरे सृष्टीं ।

संसारासी पडे तुटी । तेथ दोषाची गोठी असेना ॥९८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel