तत्र भागवतान् धर्मान् शिक्षेद्गुर्वात्मदैवतः ।

अमाययाऽनुवृत्त्या यैस्तुष्येदात्मात्मदो हरिः ॥२२॥

वरीवरी दिसती सात्विक । भीतरीं विकल्पी शिष्य एक ।

एक ते केवळ दांभिक । एक ज्ञानठक अतिधूर्त ॥२५॥

एक ते केवळ प्रतिष्ठाकाम । एकासी पूज्यतेचा संभ्रम ।

एकासी जाणिवेचा आक्रम । एकाचे पोटीं भ्रम महासिद्धीचा ॥२६॥

एक वाग्वादी वाजट । एक अतिशयेंसीं कर्मठ ।

एक केवळ कर्मनष्ट । आम्ही ब्रह्मनिष्ठ अभिमानें ॥२७॥

एका आवडे वायुधारण । एका आसनजयाभिमान ।

एकाचें संशयी मन । विश्वास पूर्ण दृढ नाहीं ॥२८॥

एक आदरें उपदेशु घेती । मग होय नव्हे विकल्प चित्तीं ।

ऐशा अनेक शिष्यपंक्ती । ते जाण निश्चितीं मायिक ॥२९॥;

आतां जे कां अमायिक । शोधितसत्वाचे सात्विक ।

मुख्य परमार्था साधक । जे अवंचक सर्वस्वें ॥३३०॥

जे गुरुचरणाचे अंकिले । जे गुरुवाक्या जीवें विकले ।

सद्गुरुलागीं वहिलें । सर्वस्व आपुलें वोवाळिती ॥३१॥

जो सद्गुरुच्या बोलावरी । जीविताची कुरवंडी करी ।

जो गुरुआज्ञेबाहेरी । तिळभरी हों न शके ॥३२॥

सद्गुरुतें मनुष्यबुद्धी । पाहोंचि नेणे जो त्रिशुद्धी ।

सेवेलागीं निरवधी । हर्षानंदीं तत्पर ॥३३॥

निजभावार्थें सादर । सेवेलागीं अतितत्पर ।

शरीर आठही प्रहर । अणुमात्र वंचीना ॥३४॥

उंच अथवा नीच काम । म्हणों नेणे मनोधर्म ।

गौण करोनि नित्यकर्म । मानी उत्तमोत्तम गुरुसेवा ॥३५॥

सेवेलागीं निष्कपट । नित्य निजभावें चोखट ।

जंव जंव सेवा पडे सदट । तंव तंव उद्भत उल्हासु ॥३६॥

सच्छिष्य असच्छिष्य समुदावो । सद्गुरुसी सारिखेचि पहा वो ।

ज्याचे हृदयीं जैसा भावो । तैसा पहा हो फळभोग ॥३७॥

भावेषु विद्यते देवो’ । हा उपदेशीं मुख्य निर्वाहो ।

आपुला आपणया भावो । फळभोग पहा हो भोगवी ॥३८॥

चुकवावया मृत्यूचा ठावो । जाणिवे आणितां निजभावो ।

हिरण्यकशिपु नाडला पहा हो । संधी साधोनि देवो निर्दळी त्यासी ॥३९॥

तेथेंचि प्रर्‍हादाचा भावो । मज रक्षिता देवाधिदेवो ।

त्यासी साक्षेपें मारितां रावो । मरणचि वावो भावार्थें केलें ॥३४०॥

परमार्थीं जें जाणपण । ते जाणावी नागवण ।

यालागीं सद्भावें जो संपूर्ण । तो जन्ममरणछेदकु ॥४१॥

मी शिष्यपरीक्षकु ज्ञाता । हे सद्गुरुसी नाहीं अहंता ।

तेथें जैशी त्याची भावार्थता । तैशा तैशा अर्था तो पावे ॥४२॥

हें असो सच्छिष्याचा सद्भावो । राया अभिनव कैसा पहा हो ।

गुरु ब्रह्म ऐक्यभावो । निजनिर्वाहो निष्टंक ॥४३॥

माझ्या इंद्रियवृत्ती चाळिता । सद्गुरु ’निजात्मा’ मजआंतौता ।

बाह्य सेवेलागीं सर्वथा । ’ब्रह्ममूर्ति’ तत्त्वतां सद्गुरु मानी ॥४४॥

सद्गुरुचरणीं आपण । चित्त-वित्त-जीवितेंसीं पूर्ण ।

करुनि घाली आत्मार्पण । सर्वस्वें संपूर्ण सर्वभावें ॥४५॥

तेथें संतुष्टला स्वामी पूर्ण । तोही सर्वस्वें भुलोन ।

आवडी निजांगें आपण । सेवका आधीन स्वामी होये ॥४६॥

आत्मार्पण करितां बळी । द्वारीं द्वारपाळ जाहला वनमाळी ।

ऐसी भजनभावाची नवाळी । सेवकाजवळी स्वामी तिष्ठे ॥४७॥

एवढी ये अगाध प्रीती । उत्तम भक्त स्वयें पावती ।

भाळ्याभोळ्यां हेचि स्थिती । कैशा रीती आतुडे ॥४८॥

याचिलागीं सद्गुरुपाशीं । शरण रिघावें सर्वस्वेंशीं ।

तो संतोषोनियां शिष्यासी । भजनधर्मासी उपदेशी ॥४९॥

जेणें भजनें भगवंत । भजोनि जाहले उत्तम भक्त ।

ते भागवतधर्म समस्त । शिकावे निश्चित सद्भावेंसीं ॥३५०॥

मुख्य भागवतधर्मस्थिती । अवश्य करावी सत्संगती ।

हेंचि सद्गुरु उपदेशिती । असत्संगतित्यागार्थ ॥५१॥;

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to श्रीएकनाथी भागवत


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
 भवानी तलवारीचे रहस्य
खुनाची वेळ
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
लोकभ्रमाच्या दंतकथा
संभाजी महाराज - चरित्र (Chava)
शिवाजी सावंत
कथा: निर्णय
पैलतीराच्या गोष्टी