सन्धोपास्त्यादिकर्माणि, वेदेनाचोदितानि मे ।

पूजां तैः कल्पयेत्सम्यक्, सङकल्पः कर्मपावनीम् ॥११॥

वर्णाश्रमनिजविधींसीं । वेदें संध्या बोलिली जैसी ।

ते ते वर्णाश्रमीं संध्या तैसी । नित्य नैमित्येंसीं करावीं ॥९०॥

वेदोक्त आचरावें सत्कर्म । निःशेष त्यागावें निषिद्ध काम्य ।

या नांव शुद्ध स्वधर्म । उत्तमोत्तम अधिकारु ॥९१॥

वेदोक्त सांडणें स्वकर्म । हाचि मुख्यत्वें अतिअधर्म ।

हाता आलिया परब्रह्म । न त्यागितां कर्म स्वयें राहे ॥९२॥

स्वयें स्वधर्म जो सांडणें । तेंचि अधर्माचं मुख्य ठाणें ।

स्वधर्में चित्तशुद्धि साधणें । यालागीं त्यागणें अहंता ॥९३॥

तेथें स्वधर्मकर्म आचरतां । ऐसा भाव उपजे चित्ता ।

’मी नव्हें एथ कर्मकर्ता । फळभोक्ता मी नव्हें’ ॥९४॥

देह जड मूढ अचेतन । त्यासी चेतवी जनीं जनार्दन ।

तेथ माझें मीपण कर्तेपण । सर्वथा जाण रिघेना ॥९५॥

या बुद्धीं जें कर्माचरण । तें भावार्थें भावीं ब्रह्मार्पण ।

यापरी निरभिमान । माझें उपासन साधकां ॥९६॥;

माझी प्रतिमा पूजाविधान । तें प्रथम माझें पूजास्थान ।

तें प्रतिमाक्रियालक्षण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥९७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel