कालेन ह्योघवेगेन भूतानां प्रभवाप्ययौ ।

नित्यावपि न दृश्येते आत्मनोऽग्नेर्यथार्चिषाम् ॥४९॥

काळनदीचा महावेगु । सूक्ष्मगती वाहतां वोघू ।

तेथ भूततरंगा जन्मभंगु । देखतांचि जगु नेदेखे ॥५२०॥

जराजर्जरित जाण । वाहतां नदीमाजीं वोसण ।

षड्‌विकार तेचि परिपूर्ण । भंवरे दारुण भंवताति ॥२१॥

बाल्यतारुण्यांचें खळाळ । वार्धक्याचें मंद जळ ।

जन्ममरणांचे उसाळ । अतिकल्लोळ उठती ॥२२॥

वोघवेगाच्या कडाडी । पडत आयुष्याची दरडी ।

स्वर्गादि देउळें मोडी । शिखरींचे पाडी सुरेंद्र ॥२३॥

तळीं रिचावितां घोगें । पाताळादि विवरें वेगें ।

नाशूनियां पन्नगें । अंगभंगें आडिमोडी करी ॥२४॥

ऐशिया जी काळवोघासीं । घडामोडी भूततरंगांसी ।

होतसे अहर्निशीं । तें कोणासी लक्षेना ॥२५॥

जैं महाप्रळयीं मेघु गडाडी । तैं पूर चढे कडाडी ।

ब्रह्मादिक तरुवर उपडी । समूळ सशेंडी वाहविले ॥२६॥

जैं आत्यंतिक पूरु चढे । तैं वैकुंठ कैलासही बुडे ।

तेथ काळा रिगू न घडे । हें अवचट घडे एकदां ॥२७॥

अनिवार काळनदीची गती । सूक्ष्म लक्षेना निश्चितीं ।

ते सूक्ष्मगतीची स्थिती । अतिनिगुतीं परियेसीं ॥२८॥

दीपु तोचि तो हा म्हणती । परी शिखा क्षणक्षणा जाती ।

ते लक्षेना सूक्ष्मगती । अंतीं म्हणती विझाला ॥२९॥

प्रत्यक्ष प्रवाहे गंगाजळ । ते काळींचे म्हणती बरळ ।

तैशी काळगती अकळ । लोक सकळ नेणती ॥५३०॥

प्रत्यक्ष पाहतां देहासी । काळ वयसेतें ग्रासी ।

बाल्य-कौमारतारुण्यांसी । निकट काळासी न देखती ॥३१॥

अलक्ष्य काळाची काळगती । यालागीं गुरु केला गभस्ती ।

त्यापासोनि शिकलों स्थिति । तेही नृपति परियेसीं ॥३२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel