ध्येयं सदा परिभवघ्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् ।

भृत्यार्तिहन्प्रणतपाल भवाब्धिपोतं, वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम् ॥३३॥

लयें लक्षें ध्यानलक्षणें । देव देवी ध्येय ध्यानें ।

तृणप्राय केलीं जेणें । हरिचरणस्मरणें तत्काळ ॥६६॥

यालागीं ध्यानासी तें वरिष्ठ । ध्यातां छेदी कल्पनादि कष्ट ।

भक्तांचें अतिअभीष्ट । मनोरथ इष्ट सदा पुरवी ॥६७॥

नित्य ध्यातां हरीचे चरण । करी भक्तदेहरोगदुःखहरण ।

इतुकेंच राया नव्हे जाण । करी निर्दळण भवरोगा ॥६८॥

भक्तांचे पुरवी मनोरथ । ते तूं म्हणसी विषययुक्त ।

परमानंदें नित्य तृप्त । निववी निजभक्त चरणामृतें ॥६९॥

वानूं चरणांची पवित्रता । शिवु पायवणी वाहे माथां ।

जे जन्मभूमी सकळ तीर्थां । पवित्रपण भक्तां चरणध्यानें ॥३७०॥

अवचटें लागल्या चरण । पवित्र झाले पाषाण ।

मा जे जाणोनि करिती ध्यान । त्यांचें पवित्रपण काय वानूं ॥७१॥

जो सदा शत्रुत्वें वर्ततां । जेणें चोरून नेली निजकांता ।

त्याच्या बंधू शरणागता । दिधली आत्मता निजभावें ॥७२॥

कोरडी आत्मतेची थोरी । तैशी नव्हे गा नृपकेसरी ।

देऊनि सुवर्णाची नगरी । अचळतेवरी स्थापिला ॥७३॥

यालागीं शरणागतां शरण्य । सत्य जाण हरीचे चरण ।

यापरतें निर्भय स्थान । नाहीं आन निजभक्तां ॥७४॥

भक्तांची अणुमात्र व्यथा । क्षण एक न साहवे भगवंता ।

प्रल्हादाची अतिदुःखता । होय निवारिता निजांगें ॥७५॥

दावाग्नि गिळूनि अंतरीं । गोपाळ राखिले वनांतरीं ।

पांडव जळतां जोहरीं । काढिले बाहेरी विवरद्वारें ॥७६॥

करूनि सर्वांगाचा वोढा । नित्य निवारी भक्तांची पीडा ।

जो कां भक्तांचिया भिडा । रणरंगीं फुडां वागवी रथु ॥७७॥

ते चरण वंदितां साष्टांगीं । भक्तां प्रतिपाळी उत्संगीं ।

ऐसी प्रणतपाळु कृपावोघीं । दुसरा जगीं असेना ॥७८॥

तरावया भवाब्धि प्रबळ । चरणांची नाव अडंडळ ।

अनन्यशरण सकळ । तारी तत्काळ चरणानुरागें ॥७९॥

ते महापुरुषाचे श्रीचरण । शरणागता निजशरण्य ।

ज्यांचें सनकादिक ध्यान । करिती अभिवंदन सद्भावें ॥३८०॥

अगाध चरणांचें महिमान । वानितां वेदां पडिलें मौन ।

ब्रह्मा सदाशिव आपण । करितां स्तवन तटस्थ ठेले ॥८१॥

अगम्य अतर्क्य श्रीचरण । जाणोनि ब्रह्मादिक ईशान ।

साष्टांगें अभिवंदन । करूनियां स्तवन करिती ऐसें ॥८२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to श्रीएकनाथी भागवत


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
 भवानी तलवारीचे रहस्य
खुनाची वेळ
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
लोकभ्रमाच्या दंतकथा
संभाजी महाराज - चरित्र (Chava)
शिवाजी सावंत
कथा: निर्णय
पैलतीराच्या गोष्टी