ममार्चास्थापने श्रद्धा स्वतः संहत्य चोद्यमः ।

उद्यानोपवनाक्रीड पुरमंदिरकर्मणि ॥३८॥

मूर्ति निपजवावी वरिष्ठ । नेटुगी देटुगी चोखट ।

साधुमुखें अतिनिर्दुष्ट । घवघवीत साजिरी ॥८३॥

मूर्ति करावी अतिसुरेख । कृश न करावी अधोमुख ।

स्थूल न करावी ऊर्ध्वमुख । रडकी दुर्मुख न करावी ॥८४॥

अंग स्थूळ वदन हीन । मूर्ति न करावी अतिदीन ।

खेचरी भूचरी जिचे नयन । विक्राळ वदन न करावी ॥८५॥

अंग साजिरें नाक हीन । वरदळ चांग चरण क्षीण ।

मोदळी बुदगुली ठेंगणें ठाण । अतिदीर्घ जाण न करावी ॥८६॥

मूर्ति साजिरी सुनयन । सम सपोष सुप्रसन्न ।

अंगीं प्रत्यंगीं नव्हे न्यून । सुचिन्ह सुलक्षण सायुध ॥८७॥

पाहतां निवे तनमन । देखतां जाय भूकतहान ।

घवघवीत प्रसन्नवदन । कृपालक्षण सुकुमार ॥८८॥

जे देखतांचि जीवीं जडे । अतिशयें सर्वांसी आवडे ।

पाहों जातां निजनिवाडें । पूरु चढे प्रेमाचा ॥८९॥

ईषत् दिसे हास्यवदन । अतिशयेंसी सुप्रसन्न ।

जिचेनि घवघवाटें निवे मन । प्रतिमा संपूर्ण ती नांव ॥१२९०॥

तेथें मेळवूनि साधुश्रेष्ठां । अग्न्युत्तारण करावें निष्ठा ।

चक्षून्मीलन प्राणप्रतिष्ठा । करावी वरिष्ठाचेनि हातें ॥९१॥

देवालय करावें गहन । वन उद्यान उपवन ।

खेंडकुलिया विश्रामस्थान । आराम जाण करावे ॥९२॥

नाना जातींचे वृक्ष तें वन । फळभक्ष वृक्ष तें उपवन ।

पुष्पवाटिका तें उद्यान । कृष्णार्पण पूजेसी ॥९३॥

हाट हाटवटिया चौपासी । नगर वसवावें देवापाशीं ।

वेदाध्ययन शास्त्रश्रवणेंसी । अहर्निशीं कीर्तनें ॥९४॥

इतुकें करावया असमर्थ । श्रद्धा आहे परी नसे वित्त ।

तरी साह्य मेळवूनि असमर्थ । मद्‍भावयुक्त करावें ॥९५॥

कां मेळवूनि भगवद्‍भक्त । त्यांत श्रद्धाळू जे वित्तवंत ।

भावपूर्वक दिधल्या वित्त । तेणें हें समस्त करावें ॥९६॥

देउळीं करूनि मूर्तिप्रतिष्ठा । परतोनि न वचे जो त्या वाटा ।

तो आळशी जाणावा करंटा । नव्हेचि चोखटा भावाचा ॥९७॥

जो करूं जाणे मूर्तिप्रतिष्ठा । धन वेंचून भावार्थी मोटा ।

नीचसेवा तो माझा वांटा । झाडितां खरांटा न संडी ॥९८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel