नात्मा वपुः पार्थिवमिन्द्रियाणि, देवा ह्यसुर्वायुजलं हुताशः ।

मनोऽन्नमात्रं धिषणा च सत्त्वमहंकृतिः खं क्षितिरर्थसाम्यम् ॥२४॥

देह आत्मा नव्हे पार्थिवपणें । इंद्रियें आत्मा नव्हतीं येणें गुणें ।

तीं तंव देहाचीं उपकरणें । एकदेशीपणें व्यापार ॥११॥

इंद्रियअधिष्ठाते देव । तेही आत्मा नव्हती सर्व ।

त्यांसी इंद्रियांचा अहंभाव । आत्मपदीं ठाव त्यां कैंचा ॥१२॥

देह चाळिता जो प्राण । तोही आत्मा नव्हे जाण ।

प्राण केवळ अज्ञान । करी गमनागमन देहवशें ॥१३॥

प्राण जरी आत्मा होता । तरी तो देहासवें न वचता ।

यालागीं प्राणासी निजात्मता । जाण सर्वथा घडेना ॥१४॥

आत्मा पृथ्वी नव्हे जडपणें । जळ नव्हे द्रवत्वगुणें ।

अग्नि नव्हे दाहकपणें । चंचळपणें नव्हे वायु ॥१५॥

आत्मा नभ नव्हे शून्यपणें । मन नव्हे संकल्पगुणें ।

अंतःकरण नव्हे नश्वरलक्षणें । चित्त चिंतनें नव्हे आत्मा ॥१६॥

आत्मा नव्हे अभिमान । त्यासी सुखदुःखांचें बंधन ।

बुद्धि आत्मा नव्हे जाण । बोधकपण तीमाजीं ॥१७॥

आत्मा नव्हे तिनी गुण । गुणांमाजीं विकार पूर्ण ।

महत्तत्त्व गुणांचें कारण । तें आत्मा आपण कदा नव्हे ॥१८॥

प्रकृति जे गुणसाम्यावस्था । तेही आत्मा नव्हे तत्त्वतां ।

आत्मदृष्टीं प्रकृति पाहतां । मिथ्या तत्त्वतां ते होय ॥१९॥

जेथ मूळप्रकृतिच वावो । तेथ प्रकृतिकार्यां कैंचा ठावो ।

यापरी आत्मानुभवो । निःसंदेहो भोगिती ॥३२०॥

यापरी साधूनियां ज्ञान । साधकीं छेदिला देहाभिमान ।

ऐसे होऊनियां निरभिमान । सदा सुखसंपन्न साधक ॥२१॥

एवं जे नित्य निरभिमान । त्यांसी प्रारब्धें विषयसेवन ।

करितां न बाधी दोषगुण । तेंचि निरुपण हरि सांगे ॥२२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel