वाचं यच्छ मनो यच्छ प्राणान् यच्छेद्रियाणि च ।

आत्मानमात्मना यच्छ न भूयः कल्पसेऽध्वने ॥४२॥

माझें स्वरूप नित्य निर्विकार । मनबुद्धिवाचा न कळे पार ।

तेथ बापुडीं इंद्रियें किंकर । प्राण निर्धार तें नेणे ॥९५॥

यालागीं शमदमांच्या अनुक्रमीं । मनबुद्धि इंद्रियें वाचा नेमीं ।

प्राण नेमूनि प्राणधर्मीं । आत्मारामासी पावसी ॥९६॥

मनबुद्ध्यादि इंद्रियनेम । करावयाचें न कळे वर्म ।

म्हणसी तरी तो अनुक्रम । ऐक सुगम सांगेन ॥९७॥

'वाचा' नेमावी माझेनि नामें । 'मन' नेमावें ध्यानसंभ्रमें ।

'प्राण' नेमावा प्राणायामें । 'इंद्रियें' दमें नेमावी ॥९८॥

'बुद्धि' नेमावी आत्मविवेकें । 'जीव' नेमावा परमार्मसुखें ।

इतुकेन तूं होसी आवश्यकें । होसी कौतुकें मद्‌रूप ॥९९॥

मद्‌रूप झालियापाठीं । संसारचि न पडे दिठीं ।

खुंटल्या जन्ममरणांचिया गोठी । गमनागमन आटाआटी निमाली ॥३००॥

म्यां सांगितल्या नेमपरिपाटीं । हा नेम करणें नाहीं ज्याच्या पोटीं ।

तो भोगी दुःखांचिया कोटी । ऐक ते गोठी सांगेन ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel