स्त्रीणां निरीक्षणस्पर्शसंलापक्ष्वेलनादिकम् ।

प्राणिनो मिथुनीभूता न गृहस्थोऽग्रस्त्यजेत ॥३३॥

नैष्ठिक ब्रह्मचारी संन्यासी । वानप्रस्थ वनवासी ।

तिहीं न पहावें स्त्रियांसी । हा मुख्यत्वें त्यांसी स्वधर्म ॥३९॥

स्त्री देखतांचि दिठीं । सांडूनियां पर्णकुटी ।

पळावें गा उठाउठी । मा कराव्या गोठी घडे केवीं ॥३४०॥

स्वप्नींही स्त्रियेच्या स्पर्शासी । करूं नये या तिघांशीं ।

करितांचि मदनु त्यांसी । वीर्यपातासी उपजवी ॥४१॥

त्या स्त्रियांसी क्रीडाविनोद । करितां विध्वंसे स्वधर्मकंद ।

यालागीं स्त्रीगुणानुवाद । न करिती शुद्ध सज्ञान ॥४२॥

स्त्रियांचे हावभावदर्शन । एकांत गुह्य संभाषण ।

नाना विनोद अंगस्पर्शन । परिहासन मदनोक्ती ॥४३॥

एतुकेंही जेथ घडे । तेथ कामाचा घाला पडे ।

स्वधर्म समूळ बुडे । धैर्याचें उडे निजसत्त्व ॥४४॥

गृहस्थाचिये प्रवृत्ती । परस्त्रियेसी ऐसी गती ।

जाहलिया जाण निश्चितीं । अपावो अंतीं पावेल ॥४५॥

स्त्री ते अग्निकुंडासमान । पुरुष तो घृतकुंभ जाण ।

तेथ द्रवतां अंतःकरण । अर्ध क्षण लागेना ॥४६॥

घृत वेंचलियापाठीं । घटासी झालीं वर्षें साठी ।

तरी अग्नीशीं जाहल्या भेटी । द्रवता पोटीं तोही धरी ॥४७॥

तेवीं वार्धक्यावयसेंसीं । एकांत जाहलिया स्त्रियेंशीं ।

गोष्टीमात विनोदेसीं । कामाचा त्यासी घाला पडे ॥४८॥

त्यागावी कामिनीसंगती । हा मुख्य त्याग परमार्थीं ।

हेंचि स्वमुखें श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥४९॥

पराशर‍ऐसा महंत । मत्स्योदरीशीं जाहला रत ।

यालागीं स्त्रियेचा एकांत । अनर्थभूत पुरुषासी ॥३५०॥

मैथुनभूत जे प्राणी । पशुपक्षी आदिकरूनी ।

सादरें न पहावे नयनीं । पाहतां कडकडूनि काम खवळे ॥५१॥

मत्स्यमैथुन देखिल्यासाठीं । खवळल्या कामाच्या परिपाठी ।

सौभर ऋषीश्वरें तपकोटी । मैथुनासाठीं नाशिल्या ॥५२॥

यालागीं कामाचें दर्शन । कां कामाची आठवण ।

पुरुषासी बाधक जाण । कामस्मरण न करावें ॥५३॥

हृदयीं नव्हे कामसंचार । तैसा करावा सदाचार ।

भूतें पहावीं मदाकार । हा मुख्य प्रकार हरी बोले ॥५४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel