वर्णाश्रमविकल्पं च, प्रतिलोमानुलोमजम् ।

द्रव्यदेशवयःकालान्, स्वर्गं नरकमेव च ॥२॥

तुझी जे का वेदवाणी । उघडी गुणदोषांची खाणी ।

अधममध्यमोत्तम मांडणी । वर्णाश्रमपणीं भेद दावी ॥२५॥

द्रव्य विहित अविहित । हेंही वेद असे दावित ।

देश पुनित अपुनीत । काळही दावीत सुष्टुदुष्टत्वें ॥२६॥

पूर्ववयीं चित्त निश्चिंत । तारुण्यीं तेंचि कामासक्त ।

वार्धक्यीं तें अतिकुश्चित । तेवीं शुद्धीं उपजवित गुणदोष वेदु ॥२७॥

तुझाचि गा वेद देख । सूचिताहे स्वर्ग नरक ।

तेणें कर्माचें आवश्यक । साधक बाधक तो दावी ॥२८॥

वर्णाश्रमांमाजील गुज । प्रतिलोमानुलोमज ।

ऐसे नाना भेदें भोज । वेदेंचि सहज नाचविजे ॥२९॥

उत्तम वर्णाची जे नारी । हीन वर्णाचा गर्भ धरी ।

तेचि संतती संसारीं । अभिधान धरी ’प्रतिलोमज’ ॥३०॥

तेचि संतती प्रसिद्ध । सूत वैदेह मागध ।

ऐशिया नामाचें जें पद । तें जाण शुद्ध प्रतिलोमज ॥३१॥

हीन वर्णाची जे नारी । उत्तम पुरुषाचा गर्भ धरी ।

ते ’अनुलोमज’ संसारीं । शास्त्रकारीं बोलिजे ॥३२॥

अंबष्ट आणि मूर्धावसिक्त । पारशव आणि सात्वत ।

इत्यादि नांवें जे वर्तत । ते जाण समस्त अनुलोमज ॥३३॥

ऐसे नाना भेदप्रकार । अविधिविधींचा विचार ।

वेद प्रकाशितो साचार । गुणदोषां माहेर वेद तुझा ॥३४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel