काम ईहा मदस्तृष्णा सतम्भ आशीर्भिदा सुखम् ।

महोत्साहो यशः प्रीतिर्हास्यं वीर्यं बलोद्यमः ॥३॥

काम म्हणिजे विषयसोसू । जेवीं इंधनीं वाढे हुताशू ।

तेवीं पुरवितां कामाभिलाषू । कामअसोसू पैं वाढे ॥७७॥

या नांव काम जाण । कामक्रिया ते ईहा पूर्ण ।

झाले विद्येचा दर्प गहन । मदाचें लक्षण या नांव ॥७८॥

झालिया अर्थप्राप्ती । वासनेसी नव्हे तृप्ती ।

चढतीवाढती आसक्ती । तृष्णा निश्चितीं या नांव ॥७९॥

अतिगर्वें जे स्तब्धता । कोणा दृष्टीं नाणी सर्वथा ।

या नांव स्तंभावस्था । जाण तत्त्वतां उद्धवा ॥८०॥

अर्थप्राप्तीकारणें । इष्टदेवता प्रार्थणें ।

प्रापंचिक सुख मागणें । आशा म्हणणें या नांव ॥८१॥

भिदा म्हणिजे भेद जाण । स्फुरद्रूप प्रपंचभान ।

माझें तुझें प्रपंचवचन । भिदालक्षण या नांव ॥८२॥

राजसुखाचा नवलभाग । विषयसुखभोग जो साङग ।

तेंचि सुख मानिती चांग । सुखप्रयोग या नांव ॥८३॥

रणीं उत्साह शूरासी । कां पुत्रोत्साह नरासी ।

विवाहोत्साह सुहृदांसी । महोत्साह त्यासी बोलिजे ॥८४॥

शास्त्रविवादीं जयो घेणें । कां युद्धीं शूर पराभवणें ।

तेणें ख्याति वाढविणें । यश मिरवणें या नांव ॥८५॥

बंदिजनांहातीं कीर्ती । स्वयें वाखाणवी दिगंतीं ।

या नांव यशःप्रीती । जाण निश्चितीं उद्धवा ॥८६॥

ऐकोनि वचनोक्ति छंदोबद्ध । उपहासीं अतिविनोद ।

तेथ राजसा हास्य विशद । जाण प्रसिद्ध उद्धवा ॥८७॥

वीर्य म्हणिजे केवळ । बलाढयता अतिप्रबळ ।

दाखवणें शारीरबळ । या नांव शीळ वीर्याचें ॥८८॥

राजबळें उद्यमव्यवहार । आंगदट जो व्यापार ।

न्याय सांडूनि स्वार्थ फार । बलोद्यमप्रकार या नांव ॥८९॥

हीं पंधराही लक्षणें । ज्यापें नांदती संपूर्णें ।

तो राजस वोळखणें । जीवेंप्राणें निश्चित ॥९०॥

केवळ अविवेकसंपत्ती । तामसाची तमोवृत्ती ।

सोळा लक्षणें त्याची स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥९१॥;

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel