गायत्र्युष्णिगनुष्टप् च बृहती पङ्‌क्तिरेव च ।

त्रिष्टब्जगत्यतिच्छन्दो ह्यत्यष्ट्यतिजगद्विराट् ॥४१॥

सकळ छंदांचें अधिष्ठान । मुख्य गायत्री छंद जाण ।

त्या गायग्री छंदाचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥४१॥

आठाअठां अक्षरीं त्रिपद । गणितां जेथ यती शुद्ध ।

त्या नांव `गायत्री' छंद । हें वेदानुवाद निजबीज ॥४२॥

हें वेदाचें निजजिव्हार । ब्रह्मज्ञानाचें परपार ।

परमानंदाचें सोलींव सार । जाण साचार गायत्री ॥४३॥

हें चैतन्याचें जीवन । मज गोप्याचें गुप्तधन ।

जेथ जीवशिवां समाधान । तें हें छंद जाण गायत्री ॥४४॥

ये छंदींचे एक एक अक्षर । अक्षराचें निजसार ।

सच्चिदानंदाचें निजभांडार । जाण साचार गायत्री ॥४५॥

करितां गयत्रीचें अनुष्ठान । विश्वामित्र झाला ब्राह्मण ।

मी कृष्ण वंदीं त्याचे चरण । माझाही तो गुरु जाण रामावतारीं ॥४६॥

यालागीं सकळ छंदीं प्राधान्य । मुख्यत्वें गायत्री छंद जाण ।

इतर छंद होती पावन । कासे लागोन पैं इच्या ॥४७॥

गायत्रीछंदाचें अंगीकारीं । त्यासी मिळाल्या अक्षरें चारी ।

`उष्णिक्' छंदाची थोरी । त्याचिवरी ठसावे ॥४८॥

उष्णिक् छंदाचे अंगीकारीं । त्यासी मिळाल्या ।

अक्षरें चारी । `अनुष्टप्' छंदाची थोरी । त्याचिवरी ठसावे ॥४९॥

अनुष्टप् छंदाचे अंगीकारीं । आणीक मिळाल्या अक्षरें चारी ।

`बृहती' छंदाची थोरी । त्याचिवरी ठसावे ॥४५०॥

एवं `पंक्ति' `त्रिष्टप्' `जगती' । `अत्यष्टि' `अतिजगती' ।

चौं चौं अक्षरांचे अधिकप्राप्तीं । छंदें वेदोक्तीं विभाग ॥५१॥

ऐशिया चतुरक्षरमिळणीं । नाना छंदांचिया श्रेणी ।

वेदरायाची राजधानी । मंत्रध्वनीं गर्जती ॥५२॥

तेथ अक्षरमर्यादा न करवे । शाखांची मर्यादा न धरवे ।

अर्थता वाच्यता नेणवें । वेद वैभवें दुर्ज्ञेय ॥५३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel