गुणैर्गुणानुपादत्ते यथाकालं विमुञ्चति ।

न तेषु युज्यते योगी गोभिर्गा इव गोपतिः ॥५०॥

सूर्य काळें निजकिरणीं । रसेंसहित शोषी पाणी ।

तोचि वर्षाकाळीं वर्षोनी । निववी जनीं सहस्त्रधा ॥३३॥

सर्व शोषूनि घे किरणीं । तें शोषितें लक्षण नेणे कोणी ।

देतां मेघमुखें वर्षोनी । निववी अवनी जनेंसीं ॥३४॥

तैसीचि योगियाची परीं । अल्प ज्याचें अंगीकारी ।

त्याचे मनोरथ पूर्ण करी । सहस्त्र प्रकारी हितत्वें ॥३५॥

ज्यासी सेविती योगी आत्माराम । त्यांचे पुरती सकळ काम ।

अंतीं करोनियां निष्काम । विश्रामधाम आणिती ॥३६॥

एवं योगी आपुले योगबळें । विषयो सेविती इंद्रियमेळें ।

जे देती त्यांसी यथाकाळें । कृपाबळें निवविती ॥३७॥

त्यांसी विषयो देतां कां घेतां । आसक्ति नाहीं सर्वथा ।

रसु शोखूनि घेतां देतां । अलिप्त सविता तैसे ते ॥३८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel