योनिर्वैकारिके सौम्ये लीयते मनसीश्वरे ।

शब्दो भूतादिमप्येति भूतादिर्महति प्रभुः ॥२५॥

वैकारिक जो सत्वगुण । व्याला देवता अंतःकरण ।

प्रळयस्वभावें आपण । मनामाजीं जाण प्रवेशे ॥५४०॥

सकळ इंद्रियांचा राजा मन । मनःकल्पना जीवशिवपण ।

श्लोकपदें ’मनसीश्वर’ पूर्ण । मनशींच जाण हरि बोले ॥४१॥

मनोदेवता अंतःकरण । घेऊनि प्रवेशे सत्वगुण ।

ज्या कार्याचें जें कारण । तेथ तीं जाण प्रवेशती ॥४२॥

शब्दतन्मात्र उरलें आधीं । तें मीनलें तामसामधीं ।

कारणीं कार्यासी अवधी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥४३॥

त्रिविधगुणी अहंकारु । एकवटला महाथोरु ।

ऐक त्याचा बडिवारु । तोचि दुर्धरु संसारीं ॥४४॥

जो शिवातें महत्त्वा चढवी । जीवातें देहात्मता गोंवी ।

अहंममता जग भुलवी । प्रभुत्वपदवी महत्त्वें येणें ॥४५॥

अहंकारु ऐसा आहे । तो जैं परमार्थीं साह्य होये ।

तैं सोहंभावाचेनि लवलाहें । विभांडी पाहें संसारु ॥४६॥

चोर जैं विश्वासू मित्र होये । तैं चोर चोरा निवारी पाहें ।

तेवीं अभिमानू जैं साह्य होये । तैं भवभय बाधीना ॥४७॥

याहीपरी अभिमान । सामर्थ्यें अतिगहन ।

यालागीं प्रभुत्वें जाण । केलें व्याख्यान उद्धवा ॥४८॥

त्रिगुणगुणीं गुणाभिमान । एकत्र होऊनियां पूर्ण ।

महत्तत्त्वीं होय लीन । अतिसुलीन तद्रूपें ॥४९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel